यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - मी तुझ्या युगानयुगे प्रतिक्षेत होतो
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
मी तुझ्या युगानयुगे प्रतिक्षेत होतो.
मी कुठे अडकलो नाही.
मी कुठे थांबलो नाही, कोणत्याही किनाऱ्यावर.
मी धावत राहीलो सतत.
डोंगरावरुन,
जमिनीवरुन,
हवेतून,
आकाशातून,
थेंबातून,
पक्ष्यांच्या थव्यातून,
कळपातून,
मातीतल्या कीटकांतून,
झाडांच्या मुळातून,
अणुतून, रेणुतून, कणातून,
तुला शोधत,
माझ्या निर्वासीत पेशी माझ्यासोबत.
मग एक दिवस दिसलीस तू मला,
पाणी भरतांना,
(ती विहीर, नदी किंवा तलाव असेल)
यापूर्वीही भेटलो होतो आपण,
कालचक्रात,
कधी तू माझ्या कपाळावरच्या जखमेवर तेल घातलस,
तर कधी पदर फाडून चिंधी बांधली माझ्या बोटाच्या जखमेवर.
मग मला तृषार्ताला दिलस तू ओंजळभर पाणी,
तेवढ्यानही भागल नाही म्हणून,
दिलस घडाभर.
मी खूप बोललो,
माझ्या गावाबद्दल, घराबद्दल, गणगोताबद्दल,
माझ्या निर्वासीतपणाबद्दल,
माझी ओढ, माझा सोस,
बरच काही….बरच काही.
तू ऐकून घेतलस शांतपणे सर्व काही.
(तुझ्या कालजयी शांततेत हे दिव्यत्व कुठून आल असेल?)
मग तू मला पदर ही दिलास सांत्वनाला,
आवेगाचा उंबरठा ओलांडल्यावर
सार काही शांत…शांत.
पण मग पुन्हा माझ्या निर्वासीत पेशींमधून डंख ठुसठुसला,
अन मला लख्ख कळाल.
माझ्या पेशी निर्वासीत नाहीच मुळी.
माझ्या पेशी अस्वस्थ आहेत.
मी अस्वस्थ आहे.
माझा आत्मा अस्वस्थ आहे,
मोहेंजेदडोपासून,
त्या सिंधू संस्कृतीच्या पहील्या प्राचीन झऱ्यापासून.
किंवा त्याही पुर्वी,
मी अमिबा होतो तेव्हापासून,
मी स्वत: लाच पुनरुक्त केले तेव्हापासून.
आणि हा योगायोग नाही काही,
हे त्याचे: माझ्या आत्म्याचे प्राक्तन आहे.
त्याला भटकेपणाचा शाप आहे.