यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - जिकडे तिकडे अफरातफर
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
कुणी इकडे, कुणी तिकडे
कुणी मागे, कुणी पुढे
हातात हात, गळ्यात गळे
पायात पाय, तळ्यात मळे
डोके खाली पाय वर
जिकडे तिकडे अफरातफर ॥१॥
कुठे दाटी, कुठे स्पेस
जिसकी लाठी, उसकी भैंस
कुणी लंगडा, कुणी काणा
दोन्ही मिळून, पुरता आणा
चिल्लर खुर्दा म्हटल्यावर
जिकडे तिकडे अफरातफर ॥२॥
कुठे बरळ, कुठे गरळ
कुणी तिरपा, कुणी सरळ
कुणी छंदी, कुणी फंदी
कुणी खुल्ला, कुणी बंदी
सगळेच मोकाट सुटल्यावर
जिकडे तिकडे अफरातफर ॥३॥
कुणी आंबा, कुणी कैरी
कुणी सख्खा, कुणी वैरी
कुठे खो-खो, कुठे लंगडी
कुठे ढोपर , कुठे तंगडी
तंगडीत तंगडी नडल्यावर
जिकडे तिकडे अफरातफर ॥४॥
कुणी अधिक, कुणी उणे
कुठे दात, कुठे चणे
कुठे माल, कुठे धमाल
घोड्याची पण, खेकडीच चाल
वजीर रणी पडल्यावर
जिकडे तिकडे अफरातफर ॥५॥
कुणी नगद, कुणी उधार
कुणी हजर, कुणी पसार
अंथरुण पाहून, पसरेल पाय
असा येथे, कुणी बी नाय
एकच चादर दोघांवर
जिकडे तिकडे अफरातफर ॥६॥
तुम्ही चरा, आम्ही चारु
नव्या बाटलीत, जुनीच दारु
कुठे भत्ता, कुठे भेळ
सत्ते साठी, जुनाच खेळ
ब्रेकींग न्यूज फुटल्यावर
जिकडे तिकडे अफरातफर ॥७॥