यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - तम वाहते प्रवाही
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
तम वाहते प्रवाही, इथला प्रकोप खारा
शिडात शिरण्या धावे, संतप्त क्षुब्ध वारा
शितल पर्णसावल्या, मिरवीत होत्या बागा
उजाड उरली माथी, सताड मोकळ्या जागा
गेले निघूनी पक्षी, शोधाया नवा किनारा
तम वाहते प्रवाही, इथला प्रकोप खारा
टिपूर चांदण्यांचा, थेंब ओघळतो एक गाली
ती रोज उतरत होती, त्या खिडकीतूनी खाली
स्तब्ध खिळूनी उभे, निखळे कुणी न तारा
तम वाहते प्रवाही, इथला प्रकोप खारा
निमूट शांततेच्या, खुणा जाहल्या मुक्या
मोडून पडले घरटे, विखुरल्या काटक्या
विझूनी शांत झाला, फुलता एक निखारा
तम वाहते प्रवाही, इथला प्रकोप खारा
-बिपीनचंद्र