यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - तडीपार झालेल्या नक्षत्रांनो
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
तडीपार झालेल्या नक्षत्रांनो
जा की गपगुमान. मुकाट्यान.
का बोलताय तावातावात
आता काय राहिलय तुमच या गावात?
तुमचा गुन्हा आहे कि नाही
ते काही माहीत नाही राव
तुम्हाला तडीपार करायचय
इतकच आहे आम्हाला ठाव
तसा लेखी आदेशच आहे आमच्याकडे
आता एक गोष्ट सांगू?
हे आपल तुमच्याआमच्यातलच
खर तर कृष्णविवराच्या गर्भातच ढकलून द्यायच
होत तुम्हाला
पण मग काही ताऱ्यांचा स्फोट झाला असता
म्हणून धाडण्यात आलय तुम्हाला
दुसऱ्या आकाशगंगेवर
तुम्ही गेल्यावर
ही आमची आकाशगंगा
पुसून चकचकीत करायचीय आम्हाला
तुमची रिकामी जागा कोण भरणार, अस म्हणताय?
देऊ की काही काजवे चिकटवून तुमच्या जागी
आम्हाला आता साध्य झालीय
काजव्यांना नक्षत्र बनविण्याची-
किमया.
-बिपीनचंद्र