Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - आपल्या समस्या लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव देशातील परीस्थिती रसातळाला गेलेली आहे असा एक मतप्रवाह आपल्याकडे आहे. ती पार रसातळाला गेली आहे असा दुसरा एक मतप्रवाह आहे. काही लोक उगाचच राईचा पर्वत करतात असा तिसरा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे मुदलात भारताचे शित देखील नसतांना त्याचा पुलाव होतो. व एखादी गोष्ट विनाकारणच वाईट दिसायला लागते. तसे नसते, म्हणजे भारतात सगळीकडे आलबेल नसते, तर शेअर बाजाराचा निर्देशांक इतक्या वर गेला असता का ? तसे माझे शेअर बाजारासंबंधी ज्ञान संशयास्पद आहे. ( शेअर बाजार हाच संशयास्पद असतो असा, पैसे गमावून बसलेला व अक्कल कमावून असलेला मित्र मला म्हणाला. तो सध्या एका शाळेसमोर चणेकुरमुऱ्यांचा व्यापारी आहे.) परंतु शेअर बाजारावर जगातील यच्चयावत, सर्व लहान मोठया घटनांचा प्रभाव पडत असतो असे माझे आज पर्यंतचे निरीक्षण आहे. त्यामुळे ज्या अर्थी निर्देशांक वर उसळलेला आहे त्या अर्थी ह्या देशात सर्व काही आलबेल आहे व सर्व चाललेल्या घटना ह्या लोकांच्या भल्यासाठीच आहेत हा त्याचा अर्थ आहे. आणि शेअर बाजार इतका सेन्सेटीव्ह आहे कि आमच्या शेजारील मालती काकूची कवळी हरवली आणि त्यांनी सुनेवर ती मुद्दाम हरविल्याचा आरोप केला. यावरुन युध्द पेटले व शेअर मार्केटचा निर्देशांक घसरला. पुढे नातवाने लपविलेली कवळी आजीला परत केली, युध्द संपले व निर्देशांक उसळला. तेव्हा विज, पाणी व रस्ते ह्या समस्या होई शकत नाहीत हे उघडच आहे. परंतु ह्या जगात चिंतातुर जंतुचे प्रमाण मुबलक आहे. वीज नाही तर काय करावे या विवंचनेत ते स्वत: पडतात व इतरांनाही पाडतात. परंतु आमच्या दामुकाकांना (हे पुर्वी सार्वजनीक बांधकाम खात्यात प्युन होते) ही विवंचना व प्रश्न मुळीच पडत नाही. ते पेन्शनर झाल्यापासुन त्यांनी रामनामाचे व्रत घेतले आहे. दिवसभर ते फाटकातच बसतात व येणाऱ्या जाणाऱ्यांना रामराम घालतात. बऱ्याच लोकांनी आता रस्ताच बदलविला आहे म्हणे. लोकांचे हे असे असते. राम सुध्दा म्हणायला नको. तेव्हा दामुकाकांना वीज आहे किंवा नाही ह्याने काही फरक पडत नाही. तेव्हा आपण हळूहळू अर्थी जीवनशैली स्वीकारली पाहीजे. आपल्या कडे मोठमोठे संत व बापु सर्व च्यानेलवरुन आपल्या कानी कपाळी ओरडत असतात. परंतु आपल्याकडे कोणाचे अस नाही मौलिक ऎकुन घ्यायची सवय नाही. सोयीस्कर तेवढे घ्यायचे, अस आहे. असो.आता घरोघरी वीज जात असल्याने केवढे फायदे आहेत, (पण अस आम्हाला घरी म्हणण्याची सोय नाही, गोष्ट आमच्या गिळण्यावर येणार व आमच्या तिन्ही त्रिकाळ अंधार उजेड न पाहता गिळण्याच्या सवयीवर येणार, तेव्हा घरी नकोच) पाटा, वरवंटा व जाते यांचे पुनरुज्जीवन (काल आम्ही एक मच्छर शर्थीने मारला. थोडयाच वेळात तो पुन्हा उडता झाला. याला पुनरुज्जीवन म्हणावे काय ?) घरोघरी झाले आहेत, त्यामुळे घरोघरच्या कुटुंबाचे आरोग्य सुधारत आहे. घरोघरी मुले कंदीलच्या प्रकाशात अभ्यास करीत बसले आहेत. त्यामुळे मोठेपणी ते नक्कीच थोर होणार. पुरेसा अंधार व एकांत मिळाल्याने (व दुसरे काही काम नसल्याने) घरोघरींंची पती पत्नींची भांडणे थंडावलेली आहेत, चोरऊचल्यांना पुरेसा धंदा मिळाल्याने अधिक गंभीर गुन्हे कमी झालेले आहेत. अंधारात पोलीस चुकून पोलिसांनाच पकडीत आहे व टाळी देऊन घेऊन, हास्य विनोद निर्मिती होत आहे असे सगळीकडे शांततेचे, सुबत्तेचे आश्वासक वातावरण आहे. अजून चार पाच वर्ष तरी असे विकासाचे वातावरण निश्चित राहील अशी ग्वाही आमच्या मंत्रीमहोदयांनी दिल्यामुळे माझे चित्र प्रसन्नतेने तुडुंब भरुन गेले आहे. तेव्हा सगळीकडे परिस्थिती अशी हळूहळू झपाटयाने सुधारीत आहे असे माझे एक मत आहे. सगळीकडे झपाटयाने विकास होत आहे असे (आणखीन) एक मत आहे. आमच्या छगनच्या मुलाने ( हा आमचा नळदुरुस्तीवाला, एकदा आमच्या घरातील पाचही नळ गळके झाले तेव्हा त्याने शर्थीने प्रयत्न करुन भगीरथा सारखे टाकीतले पाणी अडविले व फक्त चारच नळ गळके ठेवले. आपली एक आठवण म्हणुन सांगितले.) परवाच सुमो नामक वाहन घेतले. नाशिक, नांदगाव, पुणे, मालवण अशा सर्व ठिकाणी तो आता आपल्याच गाडीने जातो. तेव्हा विकास होतच आहे. लोक सगळीकडे कलुषित नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांना चांगले काही दिसत नाही. असो. आता मुंबैत मागे पुर आला तेव्हा लोक आपल्या सात्विक मुख्यमंत्र्यांना काहीच्या काही बोलले. आमचे मुख्यमंत्री हे तेल काढलेल्या सात्विक शेंगदाण्या प्रमाणे सात्विक आहेत. (लेखात तेल लिहाल तर बगदादला तुमचे पार्सल रवाना करु असा धमकीचा फोन आला. परंतु तो खालच्या गज्जुचा आहे हे म्या कॉलर आयडी वरुन वळखले. तो लेकाचा जळतो माझ्यावर ! मग मी त्याला फोन करुन दामूकाका लॉटरीची तिकीट फुकट वाटताहेत असे खोटेच सांगीतले. त्याने शंभर वेळा रामराम घातला व परत माझ्या वाटेला न जाण्याची शपथ खाल्ली.) त्यांनी कोणाला काही बोल न लावता आपल्या मनाची विठ्ठलाला बोल लावला व आपले हळूहळू काम करते झाले. त्या दिवशी मला दिवसभर वाईट वाटले. त्या दिवशी मग उपवास केला. सात्विक शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू खाल्ले व शिक्षा म्हणून दिवसभर स्टार च्यानेलवरचे भीतीदायक कार्यक्रम पाहत बसलो. आता आपल्याकडे फॉरेन सारखे गुळगुळीत रस्ते तयार व्हायला हवेत असे काही लोक म्हणतात त्यामुळे परदेशातील उद्योग आपल्या कडे येत नाहीत असा त्यांचा युक्तिवाद आहे. मुळात आपल्याकडे लोकांना भरपूर उद्योग आहेत. असे सुपीक मेंदू परदेशी उद्योगांवर रोजंदारी करुन नापीक व्हावेत असे कोणत्या शहाण्या सुरत्या मनुष्याला वाटेल ? मला तरी वाटणार नाही. दुसरे असे की, आपणाकडे वाहने जोरात हाकण्याची उत्साही तरुणांची पध्दत आहे. तर पायी चालणाऱ्या पेक्षा थोडया किंचीत आधीक गतीने चालविण्याची ज्येष्ठ नागरीकांची ( ह्याला म्हणतात भाषेची शालीनता व कुलीनता ) पध्दत अहे. त्यामुळे आपल्या मागे एखादा जेष्ठ नागरीक लुना घेऊन लागावा व त्याला मागे टाकण्यासाठी आपण भराभर चालावे तोच कोणत्याही बोळातुन येखादा तगडा मोटारसायकलस्वाराशी सर्रकन जिवाशिवाची धावती भेट व्हावी अशी परिस्थिती. तेव्हा सरकारने ह्या सर्व परिस्थितीचा विचार करुन रस्त्यावर खड्डे तसेच ठेवले आहेत. माझे मत विचाराल तर असे आहे की सरकारने यापुढे नवीन रस्त्यांसाठी खडडे करण्यासाठीच कंत्राटे दयायला हवीत. स्वच्छते विषयक समस्या विषयी आपले सरकार किती जागरुक आहे याचा विचार करता माझे मन समाधानाने काठोकाठ भरुन येते. लोक काहीही म्हणोत पण नग्नते विषयी व अश्लीलते विषयी सरकार किती तत्पर आहे त्याला तोड नाही. सरकारने या प्रश्नाला हात घालण्याचे जे धैर्य दाखविले आहे त्याला त्यामुळे आमचा सरकार वरील विश्वास दृढ झाला आहे. रस्त्यांचा, उघडया जागेचा उपयोग सकाळच्या विधीसाठी करण्यावर सरकार कारवाई करणार आहे. कारवाई स्वरुप स्पष्ट झालेले नाही. सरकार 'त्या' अवस्थेत कशी , काय व कुठे कारवाई करणार हा गज्जुला प्रश्न पडला. गज्जुचा मेंदू उलटा आहे. माझ्या मते तात्कलिक उपाय योजना म्हणून सरकारने शौचालय नसलेल्या वस्तीत बध्दकोष्ठाच्या गोळ्या वाटायला हव्यात. तेव्हा अशी सकारात्मक दृष्टी व विधायक वातावरण सगळीकडे हळूहळू निर्माण होत आहे, याचेच माझ्या मनाला समाधान आहे. |
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |