यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - अज्ञात प्रदेश
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
या कोणत्या अज्ञात प्रदेशात येऊन ठेपलोय ते कळत नाही
माझ्याच सावल्या दाखवताहेत मला वाकुल्या
अन पावलाखाली दबक्याने कुजबुजत आहे पाचोळा,
कटात सामील झाल्यासारखा;
भित्र पाखरु शोधतोय आसरा वळचणीला
अन परतीच ऊन सोडतोय दिवसापासुन
सुटकेचा निश्वास;
धुक्कच धुक दाटलय
झाडांच्या, दगडांच्या, कपारींच्या
अन माझ्या पायाच्या तळाशी;
फांद्या घासताय, चकमक झडतेय, पण रान जळत नाही
या कोणत्या अज्ञात प्रदेशात येऊन ठेपलोय ते कळत नाही
कुठे आहे तो चंद्रमाधवीचा प्रदेश?
जिथे तुझ्या उबदार कुशीत मला आश्वस्त वाटायच?
फिरवायचीस तु माझ्या चेह़ऱ्या वरुन, केसांमधुन
तुझा उष्ण मलमली हात;
पसरायचा शरीरभर उगळलेल्या चंदनाचा खोड
अनिवार व्हायची जगण्याची अनिवार ओढ
तुझ्या उबेचा झरा आता येथवर झिरपत नाही
या कोणत्या अज्ञात प्रदेशात येऊन ठेपलोय ते कळत नाही
धुम्मस होतेय,
मुंग्यांसारख्या पसरल्याहेत अदृष्य चौक्या
वाराही पडलाय गुपचुप, बांधुन मुसक्या;
प्रत्येक झाडाआडुन, दगडाआडुन, भिंतींआडुन दिला जातोय कडा पहारा
उघड्याबोडक्या डोंगराला सरसरुन येतोय थंडगार शहारा;
तो पुरातन, प्राचीन बाबा पेटवुन बसलाय धुनी
पण त्याचा उ:शाप आता येथवर पोहोचत नाही
या कोणत्या अज्ञात प्रदेशात येऊन ठेपलोय ते कळत नाही